रत्नागिरी:– बिअर बारची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच कर्मचार्याने बिअर बारमधून ३ लाख ९ हजार ८८० रूपये किंमतीची दारू चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका संशयिताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉयर्ड व्हिक्टर डिसोझा (रा. नेरूर तर्फे हवेली, ता. कुडाळ) याच्यावर न्यू समता हॉटेल ऍण्ड बिअर बारची जबाबदारी मालकाने सोपवली होती. बिअर बार व हॉटेलची जबाबदारी आपल्यावर असताना डिसोझा याने हॉटेल मालकांची कोणतीही परवानगी न घेता बिअर बारमधून लाखो रूपयांची लिकर व बिअर भरलेल्या बाटल्या घेऊन पळून गेला.
यामध्ये एकूण ३ लाख ९ हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ६०० रूपये किंमतीच्या नंबर १ रिसर्व्ह, व्हिस्कीचे १८ बॉक्स, ९९८४० रूपये किंमतीचे व्हिस्कीचे १३ बॉक्स, ३४८० रूपये किंमतीचे व्हॅट-६९, स्कॉचच्या ६ बाटल्या, ५४०० रूपये किंमतीच्या डिएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ७ बॉक्स, ३६४० रूपये किंमतीचे डायरेक्टर स्पेशलच्या २८ बाटल्या, ३८४० रूपये किंमतीच्या रोमानो वोडकाच्या २४ बाटल्या, ४३२० रूपये किंमतीच्या व्हाईट मिस्चिपच्या २४ बाटल्या, ८१६० रूपयाच्या किंगफिशर बिअरच्या ४८ बाटल्या, ३१२० रूपयांच्या लंडन बिअरच्या २४ बाटल्या व ३४८० रूपयांच्या एलपी प्रिमिअम बिअरच्या २४ बाटल्या असे मिळून ३ लाख ९ हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी राजेश दिनकर बिरबोळे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी लॉयर्ड व्हिक्टर डिसोझा याच्याविरूद्ध भादंविक ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ जाधव करीत आहेत.