रत्नागिरी:- कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील बाजारपेठ बंद राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असताना रविवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मागील २४ तासात जिल्ह्यात नवे २०७ रुग्ण सापडले आहेत. आता आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७३६ इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी जनता कर्फ्युची संकल्पना मांडली व त्या संदर्भात व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी आज श्री. राधाकृष्ण मंदिरात बैठक बोलावली. या बैठकीत दुकाने बंद ठेवण्याच्या संकल्पनेला व्यापाऱ्यानी कडाडून विरोध केला.
मागील लॉक डाऊन मुळे आधीच व्यापार तोट्यात असून आता बंद ठेवणे झेपणार नसल्याचे मत अनेक व्यापाऱ्यानी व्यक्त केले. ज्या कुणाला स्वेच्छेने दुकान बंद ठेवायचे आहे त्याने ते ठेवावे आम्ही ठेवणार नाही असे रोखठोक मत व्यापाऱ्यानी या सभेत नोंदवले. त्यामुळे आता रत्नागिरी शहराच्या तथाकथित जनता कर्फ्यु संकल्पनेला तूर्तास पूर्णविराम मिळाला असून आवश्यक खबरदारी घेत बाजारपेठ सुरू राहणार आहे.