बागायतदारांची दिवाळी गोड; परताव्यापोटी 81 कोटी खात्यात जमा

रत्नागिरी:- हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत 2022-23च्या हंगामाचा 81 कोटी 24 लाख 18 हजार 34 रुपयांचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला होता. दिवाळीच्या तोंडावर परतावा जमा झाल्यामुळे बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील 26 हजार 282 आंबा व 5,835 काजू उत्पादकांनी मिळून 32 हजार 117 बागायतदारांनी एकूण 17 हजार 622.43 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्यापैकी काजू उत्पादक 4 हजार 52 बागायतदारांना सात कोटी 44 लाख 75 हजार 954 रुपये तर आंबा उत्पादक 24 हजार 613 बागायतदारांना 73 कोटी 79 लाख 52 हजार 80 रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 24 हजार 613 बागायतदारांना 81 कोटी 24 लाख 18 हजार 34 रुपयांचा परतावा जाहीर करण्यात आला होता.

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून 45 दिवसात विमा परतावा रक्कम प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र, परतावा चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. परतावा जाहीर होऊन एक महिन्यानंतर परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झाली असल्याने बागायतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.