बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाला १० लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली येथून या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मागील दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलिसांकडून या संशयिताचा शोध घेतला जात आहे. अखेर संशयित इसम हा दिल्ली येथेच असल्याची खात्री पटताच पोलिसांकडून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

मुकेश सुरेश गुंदेचा (रा. रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश गुंदेचा यांना १६ फेब्रुवारी २०२४ रोजी वडिलांचे मित्र हसमुख जैन यांचा फोन आला. आपल्या ओळखीतील प्रकाश धारिवाल यांना १० लाख रूपयांची गरज आहे. हे पैसे तुम्ही दिल्ली येथे पाठवून द्या, यानंतर नवीन धारिवाल हे राजापूर येथे तुम्हांला पैसे आणून देतील, असे सांगितले. त्यानुसार गुंदेचा यांनी हसमुख जैन यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चांदणी चौक दिल्ली येथील दीपक नावाच्या इसमाकडे गुंदेचा यांनी १० लाख रूपये दिले. दरम्यान राजापूर येथे आपल्याला पैसे मिळणार असल्याने नवीन धारिवाल यांच्या फोनची गुंदेचा हे वाट पाहत होते. मात्र पैसे मिळाले नसल्याने गुंदेचा हे अस्वस्थ झाले. यात काहीतरी गडबड असल्याचा सशंय गुर्देचा यांना आला. त्यानुसार त्यांनी हसमुख जैन यांना फोन करून पैसे अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. हसमुख जैन यांनी तातडीने प्रकाश धारिवाल यांच्या

मोबाईलवर फोन करून पैसे का दिले नाहीत, अशी विचारणा केली. यावेळी आपण १० लाख रूपयांची मागणीच केली नसल्याचे सांगितले. हे ऐकताच हसमुख जैन यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रकाश धारिवाल यांच्या नावाचा वापर करून अज्ञाताने आपल्याला फोन केला. तसेच आपल्या माध्यमातून गुंदेचा यांच्याकडून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचे उघडकीस आले. घडल्याप्रकरणी गुंदेचा यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.