Tuesday, June 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बांधकामाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

बांधकामाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

चिपळूणमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल

चिपळूण:- तालुक्यातील धामणवणे, शिगवणवाडी येथे एकाच घराच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, ५ जून रोजी झालेल्या हाणामारीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या धक्कादायक प्रकारात दोन्ही बाजूंचे मिळून काही जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धामणवणे येथील शिगवणवाडीत मानवी महेश शिगवण यांच्या घरी संडासचे बांधकाम सुरू होते. यावेळी शेजारी राहणारे काशीराम गोपाळ शिगवण आणि त्यांचे कुटुंबीय तिथे आले आणि त्यांनी कामाला विरोध दर्शवत येथे ‘स्टे ऑर्डर’ असल्याचे सांगितले. यावरून दोन्ही कुटुंबांत बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले.

मानवी महेश शिगवण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी स्टे ऑर्डरची मागणी केली असता, काशीराम शिगवण आणि त्यांच्यासोबतच्या इतरांनी लोखंडी सळी व काठीने मानवी शिगवण, त्यांचे पती आणि सासरच्या मंडळींना बेदम मारहाण केली. यात महेश वसंत शिगवण गंभीर जखमी झाले आहेत.

काशीराम गोपाळ शिगवण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते शेतावरून घरी परतत असताना त्यांना बांधकाम सुरू असल्याचे दिसले. याबद्दल विचारणा केली असता, वसंत शिगवण, महेश शिगवण आणि मानवी शिगवण यांनी त्यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या त्यांची सून वृषाली हिच्यावरही रॉडने हल्ला करण्यात आला.

या दोन्ही घटनांच्या तक्रारींवरून ७ जून रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ आणि भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) अंतर्गत मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी कलमे लावली आहेत. एकाच कुटुंबातील आणि शेजारील लोकांमधील या वादामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.