रत्नागिरी:- बांगलादेशी नागरिकांचे भारतातील कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. शहरातील साळवी स्टॉप येथील भरवस्तीमध्ये बांगलादेशी महिला सापडली आहे.तिचे बांगलादेशीतील नाव सलमा मुल्ला असून ती रत्नागिरीत सलमा राहिल भोबंल या नावाने वावरत होती. ही महिला गेली पाच वर्षे येथे वास्तव्य करून आहे. तिने आधार कार्ड, पॅनकार्ड आदी भारत देशातील रहिवासी असल्याचे पुरावे तयार केले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि शहर पोलिसांनी ही कारवाई केली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुंबई येथे वास्तव्याला असताना सावर्डे ( चिपळूण) येथील राहिल भोबंल याच्याशी तिची ओळख झाल्यानंतर ती त्यांच्या सोबत लग्न करून रत्नागिरीत राहायला आली होती. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तालुक्यातील नाखरे येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या १३ बांगलादेशीयांना काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलिसदल व सुरक्षा यंत्रणा एकत्रित काम करून तालुक्यात व जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. ही प्रक्रिया सुरू असतानाच शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांगलादेशीय व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचे उघड झाले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशातील अनेकांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. शिरगावप्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंच व सदस्यांची मुंबई एटीएसकडून चौकशी केली गेली.
ही दोन प्रकरणे ताजी असतानाच आज एटीएस आणि शहर पोलिस यांच्या संयुक्त पथकाने साळवी स्टॉप येथे राहणाऱ्या एका बांगलादेशीय महिलेला पकडले आहे. ही महिला गेली दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव करून असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या महिलेने आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड आदी भारत देशाचे पुरावे तयार केले आहेत. या महिलेला ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर केले. एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक विनय नरावणे, पोलिस अंमलदार स्वप्नील तळेकर तसेच शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव, महिला पोलिस अपर्णा सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एजंटद्वारे बांगलादेशीय रत्नागिरीत
बांगलादेशीय नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यासाठी देशपातळीवर प्रक्रिया सुरू असतानाच रत्नागिरी तालुक्यात बांगलादेशीय नागरिकांचे वास्तव्य हा चर्चाचा विषय आहे. यामागे काही एजंट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.