बांगलादेशी नागरिकाला एक वर्षाची शिक्षा

खेड:- तालुक्यातील कळंबणी येथे वास्तव्याला असलेल्या व कळंबणी आपेडे फाटा येथील हॉटेल स्वामी लिला जवळील बांधकाम साईटवर ११ मार्च २०२५ रोजी दुपारी आढळून आलेल्या अकबर अबू शेख या बांगलादेशी नागरिकाला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांनी एक वर्षे कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कळंबणी येथे वास्तव्याला असणारा अकबर अबू शेख हा बांगलादेशी नागरिक कळंबणी आपेडे फाटा येथील हॉटेल स्वामीलीला जवळील बांधकाम साईटवर ११ मार्च २०२५ रोजी दुपारी आढळून आल्यानंतर त्याला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले.

दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस हवालदार आशीष वसंत शेलार यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर खेड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून अॅड. श्रीमती विद्या गायकवाड यांनी काम पाहिले.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी केला होता. प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार श्री. गायकवाड यांनी काम पाहिले.

अंतिम सुनावणी ६ रोजी झाली. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. चव्हाण यांनी संशयित आरोपी अकबर अबू शेख याला परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे दोषी ठरवून एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.