रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी जहाजाजवळील बंधाऱ्याजे दगड हटवून थोड-थोडा खाली बसविण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्याच्या कामाचे नियंत्रण असलेल्या पतन विभागाने ही माहिती दिली. त्यामुळे 5 वर्षानंतर मिऱ्या समुद्र किनारा सुरक्षित होणार आहे. 35 कोटीचे हे जहाज अवघ्या 2 कोटीमध्ये भंगारात काढले जाणार आहे.
एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे यासंदर्भात कस्टम, मेरिटाई बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्याच्या आत ते सडलेले जहाज कापून बाहेर काढले जाईल. त्यामुळे यंदाचा पावसापुर्वी रखडलेले मिऱ्या बंधाऱ्याचे सुमारे दोनशे मीटरचे काम करता येणार आहे. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या रखडलेल्या कामामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरुन ठेवण्यात आले होते. मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिर्या समुद्रकिनारी लागले.
दुबईहुन हे जहाज मालदीपला जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. हे जहाज काढण्यासाठी आता एम एम शिपिंग कार्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून त्याला 40 लाखाची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मुल्यांकण करेल. जहाज पाच वर्षांमध्ये प्रचंड सडले आहे. त्यामुळे 35 कोटी आणि 500 मेट्रीक टन वजणाचे जहाज अवघ्या दोन कोटी पर्यंत भंगारात निघणार आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून जहाजाजवळील बंधाऱ्याचे मोठे दगड हटवून तो बंधारा खाली बसवला जात आहे. तो आणखी सपाट करून जहाज काढण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पतन विभागाने याला दुजोरा दिला.









