बनावट नोटा प्रकरणी लांजातील तिघेजण राजस्थान पोलिसांच्या ताब्यात

लांजा:- लांजा शहरात दोन महिन्यांपूर्वी एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये तब्बल २५ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा डिपॉझिट केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एकावर लांजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराचा तपास सुरू असतानाच लांजात कामानिमित्त राहणाऱ्या व राजस्थान येथे मूळगाव असणाऱ्या एका व्यक्तीकडे बनावट नोटा सापडल्याने राजस्थान रेल्वे पोलिसांनी लांजा येथे येऊन लांजातील तिघांना चौकशीसाठी घेऊन गेल्याचे समजते. यामुळे लांजा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लांजा येथे कामानिमित्त असलेला तो कामगार व्यक्ती राजस्थान मध्ये आपल्या गावी रेल्वे ने जात होता. भरतपूर रेल्वे स्टेशनवर उतरून त्याने स्टॉलवर काही वस्तू खरेदी केल्या. मात्र त्याने दिलेल्या नोटा बनावट असल्याचे त्या स्टॉलधारकाच्या लक्षात आले. त्या स्टॉलधारकाने त्वरित रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली असता त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली. रेल्वे पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अधिक तपास केला असता त्याने आपल्याला या नोटा लांजा येथील एका व्यक्तीने दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजस्थान रेल्वे पोलिसांनी लांजाच्या दिशेने तपासचक्रे गतीने फिरवली. राजस्थानचे रेल्वे पोलीस पथक दोन दिवसांपूर्वी लांजा येथे दाखल झाले होते. लांजा पोलिसांच्या मदतीने त्या कामगार व्यक्तीला घेऊन लांजा शहरात तपास सुरू होता. लांजातील दोघेजण व कामगार अशा तिघांना राजस्थान रेल्वे पोलिसांनी अधिक तपासासाठी राजस्थान येथे घेऊन गेल्याचे समजते आहे.

लांजा ते राजस्थान कनेक्शन ?

बनावट नोटांचे लांजा ते राजस्थान असे कनेक्शन तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात असून, या बनावट नोटाप्रकरणी लांजा तालुक्यात रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र, तपासासाठी लांजातील काही व्यक्तींना राजस्थान पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याने हे सर्व प्रकरण लवकरच उजेडात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथेही बनावट नोटांच्या छापखान्यावर रत्नागिरी पोलिसांनी कारवाई केली होती.