रत्नागिरी:- बँकेला खोटं प्रमाणपत्र देऊन लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीतील एका संशयित आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. संतोष सदाशिव शिंदे (स्वरूपानंद नगर, मजगांव रोड, विमानतळ नजिक, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
त्याच्याविरोधात बँक ऑफ इंडिया शाखा एमआयडिसी, रत्नागिरीचे मॅनेजर रश्मी दिनेश कुजूर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार त्याच्यावर भा.द.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. आरोपी संतोष सदाशिव शिंदे याने रत्नागिरी येथील जिल्हा सत्र न्यायाधिश यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखलकेला होता.
बँकेतील रजिस्टर सोनार प्रदिप श्रीपाद सागवेकर ( रा. कोकणनगर ता. जि. रत्नागिरी) हे होते. त्यांनी आरोपी व इतर सलिम हुसेन निंबल, आकाशनी जनार्दन कांबळे, सुभाष जनार्दन कांबळे, तेजस्वींनी जनार्दन कांबळे, जयवंत सखाराम मयेकर, नमिता दिगंबर इंदुलकर, संतोष सदाशिव शिंदे, गणेश बाबाजी आंब्रे, तबन्ना सिद्दप्या बिखल यांचे सहाय्याने खोटे बनावट दागिने तारण म्हणून ठेवुन सोनेतारण कर्ज घेतले. सदरचे दागिने बनावट असल्याबाबत बँकेचे दुसरे रजिस्टर सोनार विजय दत्ताराम देवरूखकर यांचेकडुन सदर दागिन्यांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे लेखी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे बँक मॅनेजर यांनी वरील सर्व इसमांच्या विरुध्द रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.
त्यासंदर्भात संतोष सदाशिव शिंदे याने न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी झाली. त्यामध्ये त्याना रु. १५,००० चा अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला. आरोपीला पुढील सलग पाच दिवस ११ ते २ या वेळेत पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचा तसेच दर रविवारी १० ते २ या वेळेत चार्जशीट दाखल होईपर्यंत हजेरी लावण्याची तसेच पोलीसांना तपासकामात सहकार्य करण्याचे अटीवर जामीन मंजुर करण्यात आला. आरोपी तर्फे अँड. भाऊ शेटये, अँड. प्रथमेश शिंदे यांनी काम पाहिले.