राजापूर:- राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या नाटे शाखेत बनावट दागिने गहाण ठेवून 17 लाख 35 हजार रूपये कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी योगेश पांडूरंग सुर्वे (43, रा.कुवेशी उगवतीवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश सुर्वे याने दि.22 ऑगस्ट 2023, दि.5 सप्टेंबर 2023 व दि.9 जानेवार 2024 असे तीन वेळा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या नाटे शाखेत नकली दागिने गहाण ठेवून कर्जप्रकरण मंजूर करून घेतले. सुर्वे याने नकली दागिने गहाण ठेवून पतपेढीची सुमारे 17 लाख 35 हजार रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नाटे पोलिसांनी योगेश सुर्वे याच्या विरोधात भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मिठगवाणे येथील श्रमिक सहकारी पतसंस्थेतत खातेदारांनी गहाण ठेवलेल्या कोट्यावधीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ताजी असताना आता याच परिसरातील नाटे येथील कुणबी पतपेढीच्या शाखेत बनावट दागिने गहाण ठेवून लाखोंचे कर्ज घेतल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे