दापोली:- बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोशन गोविंद पेंढारी (मूळ रा. कोळे, ता. म्हसळा, जि. रायगड, सध्या रा. तुळशेत पाडा, भांडुप), वैभव भगत (पत्ता अज्ञात) आणि सरिता दिपक ठाकरे (पत्ता अज्ञात) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी निशीगंधा प्रशांत हेदुकर (व्यवसाय नोकरी, रा. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात रात्री ९.३२ वाजता फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत येऊन वनिता सुरेश केळकर (रा. खेर्डी, ता. दापोली) या खोट्या नावाने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून फिर्यादी यांना दाखवले. तसेच, खोटे दागिने खरे असल्याचे भासवून पतसंस्थेकडून २ लाख ९० हजार रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि फिर्यादीची फसवणूक केली.
याचबरोबर, रोशन गोविंद पेंढारी आणि सरिता ठाकरे यांनी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चिपळूण शाखेत जाऊन तेथेही सरिता नरेश तवसाळकर या खोट्या नावाने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवले. तसेच, खोटे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करून त्या शाखेचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३३५, ३३६(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.