बनावट कागदपत्रांद्वारे तटरक्षक दलात भरतीच्या प्रयत्नातील हरियाणातील तिघांना अटक

रत्नागिरी:- संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे तटरक्षक दलात भरती होण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री हरियाणामधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रत्नागिरी विमानतळ येथे तटरक्षक दलासाठी फायरमन या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ देशभरातून आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते.

कागदपत्रांची तपासणी करत असताना हरयाणामधून आलेल्या तिघांची कागदपत्रे तपासणी सुरु असतानाच सन्नी पालाराम (वय २८,रा. अलीपूर, जिंद हरियाणा),सोनु शिशुपाल (वय २२, भुडंगा, हरियाणा), सन्नी सुभाष भोसला (वय २३, रा.जीद हरियाणा) यांची कागदपत्रे तपासल्यानंतर तिघांकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचे तेथे तपासणी करणाऱ्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले. तर तिघांकडे ब्लुटुथ डिव्हाईस ही आढळून आले.

तपासणी करणाऱ्या अधिकार्‍यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर विमल रामकुमार जांगिड (वय ३५ रा. कुवारंबाव) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनंतर ग्रामीण पोलीसांनी सन्नी पालाराम (वय २८,रा. अलीपूर, जिंद हरयाणा),सोनु शिशुपाल (वय २२, भुडंगा, हरयाणा), सन्नी सुभाष भोसला (वय २३, रा.जीद हरियाणा) या तिघांविरोधात भादंविक ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५११, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अधिक तपास सपोनि श्री.शेळके करित आहेत.