चिपळूण:-बनावट कागदपत्र बनवून जमीन विक्रीचा व्यवहार केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दीड वर्षानंतर संशयितांना अटक केली. यामध्ये मनसेच्या माजी शहरप्रमुख याचाही समावेश आहे.
बनावट कागदपत्र बनवून जमीन विक्रीचा व्यवहार केल्याप्रकरणी जुल्फीकार गुलाममोहद्दीन मुकादम (५१, रा. बाजारपेठ, चिपळूण), मुबीन शहाबुद्दीन गोठे (४१, रा. गोवळकोट ), सुहेल सुलतान मेस्त्री (३३, रा. खाटीक गल्ली, चिपळूण) यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल होता. शहरातील पेठमाप येथील जाडे यांनी या संबंधीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. अटक टाळण्यासाठी संशयितांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू होते. न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांनंतर संशयित आरोपीला अटक केली आहे. संशयित आरोपीपैकी मुबीन गोठे मनसेचा माजी शहरप्रमुख आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने संशयित आरोपींना २ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नादीप साळीखे तपास करीत आहेत.