शासनाकडून मार्गदर्शन मागवले; कागदोपत्री प्रक्रिया गतिमान
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तोपर्यंत कागदोपत्री प्रक्रिया सुरुच ठेवण्यात आली आहे. त्यानुसार बदली पात्र 1200 शिक्षकांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून 8 ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत.
शिक्षकांच्या बदलीविषयी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. 28 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयात बदल्या ऑनलाईन करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने ऑफलाईन बदल्या कराव्यात, अशी सूचना देण्यात आली होती. या परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया राबवताना अनेक अडचणीचे मुद्दे समोर आले आहेत. त्यावर मार्गदर्शन मिळाल्यानंतर समुपदेशन प्रक्रिया घेण्यात येणार आहे. तोपर्यंत गटस्तरावरून बदली पात्र शिक्षकांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्राप्त माहितीवरून जिल्ह्यातील निव्वळ रिक्त पदे, समानीकरणासाठी ठेवावयाची रिक्त पदे, बदली अधिकार पात्र शिक्षक यादी, बदलीपात्र शिक्षक यादी बनविण्यात आली आहे.
गटशिक्षणाधिकारी स्तरावरून त्या याद्या प्रसिध्द करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांचा आकडा 1200 इतका आहे. एकुण शिक्षकांच्या 15 टक्के बदल्या केल्या जाणार आहेत. सध्या तयार केलेल्या याद्या सर्व शिक्षकांपुढे ठेवण्यात येणार असून 8 ऑगस्टपर्यंत सबळ पुराव्यासह हरकती कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत.