बदलीप्राप्त शिक्षकांच्या यादीत जिल्ह्यातील 405 जणांचा समावेश

रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा जिल्हा बदलीचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या बदलीप्राप्त शिक्षकांच्या यादीत जिल्ह्यातील 405 जणांचा समावेश आहे. असे असले तरी जिल्ह्यात 15 टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने त्यांना न सोडण्याचा निर्णय सध्यातरी जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या बदलीची वाट बिकट बनली आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. राज्यातील या बदल्यांवर रविवारी शिक्कामोर्तब होवून सोमवारी अंतिम यादी निश्चित केली आहे. शिक्षक बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप दरवेळी केला जात होता. यामुळे या प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या धोरणानुसारच या बदल्या करण्यात येत आहेत.  

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्ह्यातील 405 शिक्षकांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात जाणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. बदल्या झाल्या असल्या तरीही जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या 15 टक्केपेक्षा अधिक असल्याने पात्र शिक्षकांना ना हरकत दिली जाणार नसल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या 2 हजार 522 प्राथमिक शाळांमध्ये 7 हजार 218 मराठी माध्यमाचे तर 498 उर्दू माध्यमाचे शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी मराठीची 15 टक्के तर उर्दूची 20 टक्के पदे रिक्त आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये नव्याने भरतीच झालेली नाही. दरवर्षी सेवानिवृत्ती घेणार्यांची संख्याही वाढत असल्याने रिक्त पदांच्या संख्येत भर पडलेली आहे. तरीही शिक्षक संघटनांच्या मागणीमुळे आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज भरुन घेण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करुन घेण्यात आला होता. त्यानुसार 989 शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले. त्यातील 14 प्रस्ताव पडताळणीत रद्द करण्यात आले होते.

राज्यस्तरावरुन आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात 405 शिक्षक बदल्यांसाठी पात्र ठरलेले आहेत. जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेता या पात्र शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.