राजापूर:- तालुक्यातील नाणार, पाळेकरवाडी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ११ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरेश मरतु प्रभू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाटे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश मरतु प्रभू (७४, रा.नाणार पाळेकरवाडी, सध्या गोरेगाव, मुंबई) हे सेवानिवृत्त असून सध्या ते पत्नीसह मुंबई येथे वास्तव्याला होते. त्यामुळे नाणार, पाळेकरवाडी येथील त्यांचे घर मागील काही महिने बंद होते. ९ ऑक्टोबर रोजी ते आपल्या घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाची फळी दगडाच्या सहाय्याने तोडल्याचे निदर्शनास आले. घराच्या मागील दरवाजाही उघडा होता व घरातील स्मार्ट टीव्ही व अन्य किरकोळ साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेत सुमारे ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.