रत्नागिरी:-संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फ देवळे येथील बंद घर चोरट्यांनी फोडून ४ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी गुरुवार दिनांक १७ मार्च रोजी रात्री १२ वाजता देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद संग्रामसिंह पुंडलीक राजपूत यांनी दिली आहे. संग्रामसिंह राजपूत हे गुरुवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी चोरट्यानी साधून घराच्या समोरील दरवाजा लावलेले कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील दागिने रोख व रक्कम लंपास केली आहे . सायंकाळी राजपूत पुन्हा घरी आले असता चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ साखरपा पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार नोंदवली. साखरपा पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा पुतळी हार, १ लाख ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, १ लाख ७३ हजार रुपये किमतीचे दोन डवली असलेले सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे कानातली सोन्याची पुतळी असे एकूण ४ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे संग्रामसिंह राजपूत यांनी फिर्यादीत नमूद केले. हा चोरीचा प्रकार गुरुवारी दुपारी२ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. भर दिवसा चोरीची घटना घडल्याने हाहाकार उडाला आहे.
राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यान विरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री १२ वाजता भारतीय दंड विधान कायदा कलम ४५४, ३८०, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहे. त्याबरोबर साखरपा येथील विजय कृष्णाजी लोटणकर व दिनेश गंगाराम पांचाळ यांची घरे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र तो असफल झाला.