बंद घर फोडून चोरट्यांचा १० तोळे सोन्यावर डल्ला, रत्नागिरीतील ‘ग्रामीण’ भाग चोरट्यांचे ‘लक्ष्य ‘

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप संजीवनी नगर येथे बंद घर फोडून चोरटयांनी तब्बल १० तोळे ३१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. . याबाबत पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

गोळप संजीवनी नगर येथील राकेश रमेश बने ( ४१) पत्नी सौ. गार्गी, आई सौ. रश्मी, वडील रमेश नारायण बने, मुलगा विहान असे एकत्र राहतात. दि. २७ रोजी सकाळी ०८.३० वा. चे सुमारास बने कुटूंबासह कोल्हापुर येथे देवदर्शन करीता गेले होते. देवदर्शन करून जरकनगर (जि. कोल्हापुर ) येथे एक दिवस राहिले. दि. २८ रोजी दिवसभर फिरुन रात्री १०.३० वा. चे सुमारास बने कुटुंब घरी संजिवनी नगर येथे आले. तेव्हा घरासमोरील लोखंडी गेट उघडून अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कठीण वस्तुचा उपयोग करून दरवाजा तोडून , घरात प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा होता कपडे अस्ताव्यस्त टाकलेले होते. तसेच कपाटाचा ड्राव्हर बाहेर ओढलेल्या स्थितीत होते. कपाटाचा ड्राव्हर तोडून त्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरीस गेल्याचे निर्देशनास आले.

घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. १८,००० रुपयाचे (दर खरेदी दराने ) एक सोन्याच्या धातुचा पिवळसर रंगाचा १ तोळे वजनाचा फूल व पानंची डिझाईन आणि मध्यभागी लोंबकळणा-या चेनी असलेला हार, सोन्याची चेन, ४ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, १ तोळे ६ ग्रॅम वजनाचे साखळी डिझाईन सहा बांगड्या, 3 तोला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 2 ग्रॅम सोन्याची अंगठी, एक तोळे ७ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या धातुचा झुमका, ४ ग्रॅम वजनाचे वळे, रोख 5 हजार असा एकुण ३,३७,५०0 रुपये एवज चोरीला गेला. घरातील अन्य वस्तु व्यवस्थित होत्या. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गोळप येथे झालेल्या चोरी प्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील एका संशयितला ताब्यात घेतले आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडे चोरीला गेलेल्या दागिन्यांचे काही पुरावे सापडले आहेत.