रत्नागिरी:- वडिलांचे बँक खाते अँपद्वारे अपडेट करत असताना चूक झाली. यानंतर तरुणाने ग्राहक सेवा केंद्रात फोन केला. ग्राहक सेवा अधिकारी म्हणून बोलणाऱ्या अधिकाऱ्याने एनी डेस्क अँप डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्यातील 1 लाख 18 हजार रुपये ऑनलाइन लांबवल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तेव्हढ्याच मोठ्या प्रमाणात पोलीस देखील जनजागृती करीत आहेत. मात्र तरीदेखील अनेकांची फसगत होत असल्याचे दिसत आहे. आपल्या वडिलांचे बँक खाते अपडेट करण्याच्या नादात रत्नागिरीतील राहुल आनंद वळवी (वय ३४ रा सिद्धिविनायक नगर, शिवाजी नगर रत्नागिरी) या तरुणाला सायबर चोरट्यांनी तब्बल १,१८,३५४ रुपयांचा गंडा घातला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल वळवी हा आपल्या वडिलांचे एसबीआय बँकखाते अॅप द्वारे अपडेट करीत असताना प्रॉब्लेम आला. म्हणून त्याने ग्राहक सेवा केंद्रात फोन केला असता ग्राहक सेवा अधिकारी असे सांगणाऱ्या व्यक्तीने एनी डेस्क हा अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे राहुल याच्या वडिलांचे खात्यामधून १,१८,३५४ रुपये रक्कम काढून घेऊन फसवणूक केली. याबाबतची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात देण्यात आली असून पोलिसांनी एसबीआय बँकचे ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.