बँकेने सिल केलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बँकेकडे गहाण ठेवलेल्या आणि बँकेने ताब्यात घेतलेल्या कोकणनगर येथील इमारतीमधील सदनिकेत अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना २५ व २६ जुलैला कोकणनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेकडून प्लास्टिक व्यवसायासाठी २० फेब्रुवारी २०१६ या कालावधीत १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या कर्जास सुरक्षितता म्हणून झाडगाव पालिका हद्दीच्या बाहेरील कोकणनगर येथे बांधण्यात आलेल्या इमारतीमधील फ्लॅट मिळकत बँकेकडे गहाण ठेवली होती. परंतु बँकेकडून योग्य त्या कायदेशीर नोटिसा देऊनही संशयित महिलेने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून गहाण मिळकतीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ताबा घेतला. मात्र सदनिकेमध्ये संशयित महिलेने सील व कुलूप तोडून ताबा घेतला.

या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.