बँकेने जप्त केलेल्या घराचे ‘सील’ तोडून अनधिकृत प्रवेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; देवरुखमध्ये कर्जदारावर गुन्हा दाखल

देवरुख:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून, त्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या वतीने एका कर्जदाराविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश शिरीष पवार (वय ३५, रा. मालाड, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

​आरोपी प्रथमेश पवार याने बँक ऑफ इंडियाच्या देवरुख शाखेकडून १८ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्याने देवरुख नगरपंचायत हद्दीतील घर क्र. ४४९ (क्षेत्र ३०० चौ.मी.) ही मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली होती. मात्र, कर्जाची परतफेड न केल्याने ३१ मार्च २०२१ रोजी हे खाते थकीत झाले होते.

​कर्ज वसुलीसाठी बँकेने कायदेशीर प्रक्रिया राबवून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, १२ एप्रिल २०२४ रोजी तहसीलदार देवरुख यांनी सदर घराचा अधिकृत ताबा बँकेला दिला. त्यानंतर बँकेने या घराला आपले सील लावून टाळे ठोकले होते.

​१३ एप्रिल २०२४ ते १९ मे २०२४ या कालावधीत आरोपीने बँकेच्या ताब्यातील मिळकतीत गैरहेतूने प्रवेश केला. त्याने दरवाज्याचे सील आणि कुलूप तोडून मालमत्तेचे नुकसान केले आणि बेकायदेशीरपणे घराचा ताबा घेतला. विशेष म्हणजे, प्रशासनाने ताबा घेतलेल्या या घरात कोणीतरी अनोळखी व्यक्ती बेकायदेशीरपणे राहत असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. हा प्रकार लोकसेवकांनी जारी केलेल्या आदेशाचा थेट भंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार रामबदनसिंह (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी आरोपी प्रथमेश पवार याच्यावर भारतीय दंड विधान कलम ४२७, १८८, ४४७, ४४८ आणि सरफेसी कायदा २००२ (कलम २९) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.