रत्नागिरी:- मोबाईलवर फोन करुन तसेच ई-मेलव्दारे प्रौढाशी संपर्क करून गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील फगरवठार येथील प्रौढाला सुमारे 1 लाख 19 हजार 950 रुपयांचा ऑनलाईन चूना लावल्याप्रकरणी दोन संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना गुरुवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारी 3 वा.कालावधीत घडली आहे.
अॅड.सुरेश गुप्ता आणि निधी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात आशिष अनिल घाग (55,रा.वरचा फगरवठार,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,गुरुवारी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर अॅडव्होकेट सुरेश गुप्ता नावाच्या माणसाने फोन केला. तसेच एम.के.इंटरप्रायझेस कंपनीच्या ई-मेल आयडीवरुन मेल करुन फूस लावली.त्याच्या आमिषाला बळी पडून घाग यांनी सुरेशच्या बॅक खात्यात 1 लाख 19 हजार 950 रुपये भरले. परंतू त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाग यांनी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.