Tuesday, June 2, 2026
spot_img
Home दापोली फुरूस-पोयनार मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

फुरूस-पोयनार मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील फुरूस ते पोयनार मार्गावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अचानक रस्त्यावर आलेल्या गाईला धडक दिल्याने हा अपघात घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास चिखलकर हे ३० मे रोजी आपली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच ०८ ए ०७४१) घेऊन पाणी आणण्यासाठी फुरूसच्या दिशेने जात होते. दरम्यान, फळसोंडा जामा मशीद परिसरात अचानक एक गाय त्यांच्या दुचाकीसमोर आली. गाय समोर आल्यामुळे चिखलकर यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विकास चिखलकर हे एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे चिखलकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण फुरूस गावात शोककळा पसरली आहे.

या अपघातानंतर फुरूस-पोयनार मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा रस्ता दाट वस्तीतून जात असूनही वाहने भरधाव वेगाने धावत असतात. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.