फुणगुस येथे पुन्हा अपघात, ट्रक दरीत कोसळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅपद्वारे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता. फुणगुस येथील अवघड वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. 15 दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

पार्लेजी पेपर रॅपिंग रोल ट्रक (एम एच 48 जीबी 2930) घेऊन गोव्याहून वसईकडे चालला होता. यामध्ये 7 टन माल होता. फुणगुस येथे ट्रॅक आला असता अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट 30- 40 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने बचावला. अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थानी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक, गावातील ग्रामस्थ यांनी मदत केली. यापूर्वी दोन दिवसापूर्वी देखील अशीच घटना घडली होती त्यावेळेला गावातील ग्रामस्थ किरण भोसले आणि साहिल खान दोन दिवस अहोरात्र मेहनत घेतली.या अपघाताची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.