प्रॉपर्टीच्या वादातून गुरांचा गोठा जाळला; 40 हजाराचे नुकसान

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील वडगाव बु. बौध्दवाडी येथे प्रॉपर्टीच्या वादातून गुरांच्या गोठयाला आग लावल्याची घटना 4 जून रोजी दुपारी 2 वा. च्या घडली. या आगीत गोठयाचे 40 हजार रुपयांची नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद निलेश यशवंत सकपाल (31, रा. वडगाव, बु. बौध्दवाडी) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सकपाल हे घरी असताना भाउ नितेश यशवंत सकपाल (35) याने घरी बापाचे प्रॉपर्टीचा हिस्सा बहिणीला मिळणार नाही असे सांगितले. त्यानंतर रागाच्या भरात नितेश याने वाडयाच्या भोवतालची सलदी काढून माचिसने गुरांच्या गोठयाला आग लावली. या आगीत गोठयाचे 40 हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने गुरे नसल्यामुळे हानी झाली नाही. निलेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितेश याच्यावर भादविकलम 435, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.