दापोली:- शहरातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने सोशल मीडियावर मुलीची बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे . मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली . न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनिकेत रवींद्र ढेपे – पाटील ( २४ ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे . त्याने शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले . मात्र , या मुलीने त्याला नकार दिल्याने अनिकेतने सोशल मीडियावर या मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला . त्यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली . दापोली पोलीस स्थानकात अनिकेतविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम , लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे . पोलीस निरीक्षक विवेक आहिरे अधिक तपास करीत आहेत.









