प्रेमविवाहाच्या रागातून एकास मारहाण; अपहरणाचाही प्रयत्न

  संशयितांविरुद्ध गुन्हा

चिपळूण:- प्रेमविवाह केल्याच्या रागातून एकास अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार चिपळूणमध्ये सोमवारी सायंकाळी घडला. याबाबत शहरातील मजरेकाशी येथील फैजान अब्दुल कादीर कर्जिकर याने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कर्जिकर हा नगरसेवक साजिद सरगुरुह यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. २७ जानेवारीला त्याने एका तरुणीबरोबर कायदेशीर विवाह केला. त्या रागातून सोमवारी (ता. २) सायंकाळी फैजान हा आपल्या मालकाच्या घरातून फॅक्टरीची चावी घेऊन फॅक्टरी उघडण्यासाठी जात होता. संशयित अमान नाडकर, तबीश पेचकर आणि समीर पेचकर यांनी त्याचे अपहरण करून जबरदस्तीने गाडीत कोंबले. तोंड दाबून त्याला मारहाण करत गुहागर बायपासमार्गे खेडच्या दिशेने नेले. महामार्गावर लवेल (ता. खेड) येथे रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवण्यात आली. तेथे फैजानचा जबरदस्तीने व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर त्याला एका वकिलाकडे नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्याकडून जबरदस्तीने फुस लावून प्रेमविवाह केल्याचे लेखी लिहून घेतले जाणार होते. परंतु फैजानच्या वतीने त्याचे नातेवाईक आणि नगरसेवक सरगुरुह पोलिस ठाण्यात गेल्याचे समजल्यानंतर अमान नाडकर, तबीश पेचकर, समीर पेचकर, मुस्कान दलवाई आणि अय्याज शहा तेथून पसार झाले. याची तक्रार फैजान कर्जिकर याने चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.