रत्नागिरी:- प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरीच्या कार्यकक्षेत रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली हे चार जिल्हे नेमून दिलेले आहेत. या मनोरुग्णांलयाकरीता एकूण खाटांची संख्या 365 असून सरासरी आंतररुग्णांची संख्या ही 225 ते 250 इतकी आहे. तसेच या रुग्णालयामध्ये दररोज सरासरी 125 ते 150 बाहयरुग्ण उपचारांकरीता येत असतात. मात्र आजघडीला वैद्यकीय अधिकार्यांची 7 पदे रिक्त असून याविषयीचा प्रस्ताव आता पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिक्षक – 1, उपधिक्षक – 1, मनोविकृती तज्ञ – 1,बधिरीकरण – 1, वैद्यकीय अधिकारी -3 (सर्व गट-अ) चे एकुण 7 पदे मंजूर असून त्यापैकी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.तसेच वैद्यकीय अधिकारी (गट-ब) चे 1 पद मंजूर असून संबंधित पद हे बदलीने रिक्त आहे. मनोविकृतीतज्ञ व वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकुण 7 पदे रिक्त असल्याने मनोरुग्णांना सेवा देताना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात मनोरुग्णालय प्रशासनाने नमूद केले आहे.
सद्यस्थित या रुग्णालयाकडील मनोरुग्ण तपासणी व उपचार करण्याकरीता जिल्हा रुग्णालयाकडील एका मनोविकारतज्ञांची आडवडयातून एक दिवस सेवा वर्ग करण्यात आलेले आलेले आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक,रत्नागिरी यांचे मार्फत अकरा महिन्याकरीता मानधन पध्दतीने एका मनोविकारतज्ञाची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आलेले आहे. दाखल असलेल्या मनोरुग्णांची वैद्यकीय तपासणी व उपचार तसेच दाखल करण्यापुर्वी सदर रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणे क्रमप्राप्त असल्याने वैद्यकीय अधिकारी हे पद गरजेचे आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे हे रुग्णालय 24ु7 प्रत्येक विभागात आवश्यकतेनुसार पुरेसे मुनष्यबळ पुरवून रुग्णसेवा देणे अपेक्षित असताना अपुर्या ( मंजूर पदांच्या क्षमतेने 51 टक्के) मनुष्यबळावर ही कसरत करताना प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत / अपघातजन्य स्थितीत रुग्णालयात प्रभावी व दर्जेदार सेवा देताना या अपुर्या मनुष्यबळामुळे हतबलता निर्माण होत असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले.
तरी प्रादेशिक मनोरुग्णालय,रत्नागिरी येथील कामकाज सुरळीत व पुर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी मनोविकृतीतज्ञ व वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची रिक्त पदे तातडीने भरणेबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही व्हावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.









