प्राथमिक शिक्षक समितीचे उद्या कोकणभवन समोर लक्षवेधी धरणे आंदोलन

रत्नागिरी:- कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांपैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या सुमारे १५ टक्के पेक्षा अधिक रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तात्काळ भरण्यात याव्यात, आंतरजिल्हाबदली झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २८० शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, आंतरजिल्हा बदली टप्पा क्र. ५ मध्ये कोकण विभागाचा प्राधान्याने समावेश व्हावा, आरटीई कायद्याला छेद देणारे शासनाचे ९ जानेवारी, २०१९ चे पत्र रद्द करावे, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी रिक्त पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावीत या मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनसमोर उद्या सोमवारी २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो आंतरजिल्हा बदली बांधव व शिक्षक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आंदोलनाचे नियोजन करत आहेत.

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक समिती ने संपात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनावर दबाव निर्माण केला आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून हे आक्रमक पाऊल टाकले जात आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली संबधाने गेल्या ५-६ वर्षापासून विविध गंभीर प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांबाबत संघटनेने सातत्याने जिल्हास्तर ते राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. परंतू रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा बदली झालेले मराठी व उर्दू माध्यमाचे सुमारे ५०० शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे शासनाच्या आंतरजिल्हाबदली टप्पा क्र. ५ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या जिल्ह्यांमधील कार्यरत आंतरजिल्हाबदली शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत संघटनेची दि. १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी कोकण विभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज्याध्यक्ष उदयजी शिंदे यांचेसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हाबदली बाबत कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांवर कमालीचा अन्याय झालेला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्यावतीने दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कोकण भवनसमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता याला बाधा न पोहचवता कोव्हिड १९ संदर्भातील नियमांचे पालन करुन तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
राज्य नेतृत्वाखाली कोकण विभागाचे होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कोकण विभागाचे अध्यक्ष अंकुश गोफणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, सरचिटणीस संतोष सुर्वे, विजयकुमार पंडित, सुजित साळवी, अजित भोसले, संतोष पावणे, राजू डांगे, नवनाथ पांचाळ, दिनेश झोरे, विनायक वाळंज, राजीव दरडी, शंकर वरक, उमाकांत जाधव, भाई महाडिक, प्रभाकर खानविलकर, अरविंद जाधव , दीपक शिंदे, दीपक मेढेकर, परशुराम पेवेकर सर्व तालुक्यातील अध्यक्ष, सचिव संघटना पदाधिकारी नियोजन करत आहेत.
या आंदोलनात कोकण विभागासह राज्यातील हजारो आंतरजिल्हा बदली शिक्षक सहभागी होणार आहेत. यामुळे शिक्षक वर्गात शिक्षक समितीच्या भूमिकेबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. आंदोलनाला पाठिंबा वाढतच आहे.