रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी दिडशे चाचण्या दररोज करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी दरदिवशी दोन पथके पाठविली जात आहेत. यामध्ये कुचराई करणार्या अधिकारी, कर्मचार्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हाधिकार्यांमार्फत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता कोरोनाबाबत आढावा घेतला जातो. त्यात प्रामुख्याने दररोज होणार्या कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान 150 चाचण्या करणे बंधनकारक केले आहे. त्यात 100 आरटीपीसीआर आणि 50 अॅण्टीजेनचा समावेश असले. चाचण्या करताना प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या संपर्कातील वीस व्यक्ती, हॉटस्पॉट किंवा आऊटब्रेक असलेली गावे-वाडी, सुपरस्प्रेडेर म्हणजे भाजीपाला विक्रेते, किराणा, फळे विक्रेते व अन्य दुकानदार यांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुखांनी दररोज आपल्या हद्दीतील 2 गावात जिथे जास्त प्रार्दुभाव आहे, तिथे चाचण्या शिबिरे लावून चाचण्या करावयाच्या आहेत.
चाचण्यांच्या आदल्या दिवशी ग्राम कृती दल, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आदींनी गावातील 100 टक्के लोकांच्या चाचण्या करण्याबाबत व कोरोना नियम पाळण्याबाबत जनजागृती करावी. दुसर्या दिवशी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्राम कृती दल उपस्थित राहून चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. सर्व ग्रामसेवकांनी दररोज मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे आदी नियमांचे भंग केल्यामुळे किमान दहा जणांवर दंडात्मक कारवाई करायची आहे. नगरपालिका क्षेत्रातील पथकाने किमान 50 जणांवर कारवाई करायची आहे.
सर्व मंडळ अधिकारी यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य क्षेत्रातील चाचण्यांचे वेळापत्रक घेऊन जनजागृती व नेमून दिलेल्या गावात चाचण्या 100 टक्के करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. याबाबत कुचराई करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात येईल. चाचण्यांचे लक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरेल, त्या संपूर्ण टीमवर कारवाईबाबत जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ज्या गावात चाचण्यांसाठी सहकार्य मिळणार नाही, तेथे तालुकास्तरीय पथक भेट देऊन मार्गदर्शन करेल. तथापि विरोध राहिल्यास संपुर्ण वाडी, गावात कडक निर्बध लादण्यात येतील. यापूर्वी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना कोरोना कामकाजासाठी एक गाव नेमून दिलेली आहेत.









