रत्नागिरी:- मिर्या-नागपूर महामार्गाच्या चौपदीकरणांतर्गत भुसंपादन केलेल्यांना मोबदला देण्यासाठी 92 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत; मात्र रत्नागिरी प्रांताधिकार्यांकडून झालेल्या हलगर्जीपणातून काही जमीनधारकांना मोबदला वाटप झालेले नसल्याचे पुढे आले आहे. वृत्तपत्रातून आलेल्या बातमीची दखल घेऊन तक्रारी वगळून अन्य मोबदल्याचे वाटप करुन आठ दिवसात अहवाल सादर करा अशा सुचना जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार भास्कर जाधव (व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे), नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार तसेच संबंधित अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते.
मिर्या-नागपूर महामार्गासाठी जमिनी दिलेल्यांपैकी अनेकांना मोबदलाच वाटप केलेला नसल्याचे वृत्त सकाळने प्रसिध्द केले होते. याची दखल खासदार राऊत यांनी घेतली. दिशा समितीमध्ये खासदार यांनी जिल्हाधिकार्यांना सुचना दिल्या आहेत. ते म्हणाले, मोबदला वाटपात जमीनधारकांचा काहीच दोष नाही. प्रांताधिकारी यांच्याकडून चालढकलपणा झालेला आहे. तत्काळ पैसे मिळणे हा, त्यांचा हक्कच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाईल.
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी ते म्हणाले, कृषि क्षेत्रात उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. बँंकांनी कर्ज पुरवठा करताना लाभार्थ्यांच्या त्रुटी लक्षात घेऊन काम करा अशा सुचना दिल्याआहेत. स्वच्छ भारतअंतर्गत रत्नागिरी नगरपालिकेसारखे इतर नगरपालिकांना आणखी चांगले मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करा. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर आहे, तिथे दुसरा डॉक्टर देण्याचा प्रस्ताव सादर शासनाकडे दिला जाईल. कोरोना कालावधीत आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांविषयी राज्य शासनाकडून ग्राहकांना दिवाळी भेट दिली जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेष योजना जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.