प्रशासन मेर्वीतील बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पाहतेय? – ग्रामस्थांचा आरोप

रत्नागिरी:- पावस मेर्वी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. माणसांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. हल्ला झाल्यावर प्रशासन काही दिवस उपाययोजना करते मात्र बिबट्याचा बंदोबस्त होत नाही. हा हलगर्जीपणा मनुष्याच्या जीवावर बेतू शकतो. प्रशासन बिबट्या नरभक्षक होण्याची वाट पहात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. 

याबाबत जांभुळआड पूर्णगड येथील जयंत फडके यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्य करणारी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटलंय मेर्वी परीसरात गेले काही दिवस बिबट्याने थैमान घातले आहे.  हा त्रास गेले तीन चार वर्षे कमी अधिक प्रमाणात आहेच. पण गेले काही दिवस यात वाढ झाली आहे. या परिसरातील बहुतांश लोकांची शेती आहे, गुरेवासरे आहेत. काही लोक दुचाकीने छोट्या मोठ्या नोकरीव्यवसायासाठी पावस रत्नागिरीला जा-ये करणारे आहेत.  

गेले कही दिवस बिबट्याने मुख्यरस्त्यावरच हल्ला सत्र सुरू केले आहे. भर दिवसाही तो लोकांना दिसत आहे, हल्लाही करीत आहे.रत्नागिरी पासुन देवगड पर्यंत जाणायेणारे लोक याच रस्त्याने जा-ये करतात त्यांना या दहशतीखाली प्रवास करावा लागत आहे.  बिबट्याने हल्ला केला कि वनविभागाला कळवले जाते. जखमींवर उपचार होतात. हल्ल्याच्या तिव्रतेनुसार काही आर्थिक मदत दिली जाते. वनविभाग कर्मचारी गस्त घालतात, पिंजरे बसवतात, कॅमेरा लावतात. काही दिवस बिबट्याचा विषय चर्चेत असतो. पुन्हा  हल्ला होईपर्यंत ही साखळी सुरूच रहाते.    

वन्यजीव संरक्षण कायद्याने सा-या कोकणात शेतक-यांचे जीवन वानरमाकडांनी उध्वस्त केले आहे. आता बिबट्याने जगणेच मुश्किल केले आहे. वन्यजीव रक्षण करताना माणसाचे जीणे मुश्किल झाले आहे त्याचे काय? असे फडके यांचे म्हणणे आहे.
बिबट्या नरभक्षक जाहीर झाल्याशिवाय त्याला मारता येत नाही मग आता कोणीतरी मरायचीच वाट बघायची का? वन्यजीवासाठी माणसाच्या जीवाची किंमत द्यायची का? असा सवाल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.