प्रवासी तरुणीशी अश्लील वर्तन करणारा विकृत रिक्षा चालक अवघ्या एका तासात जेरबंद

रत्नागिरी:- जयस्तंभ ते कुवारबाव रिक्षा प्रवासादरम्यान विकृत रिक्षा चालकाने एका महाविद्यालयीन तरुणीशी असभ्य अश्लील वर्तन केले होते. याबाबत तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराला वाचा फोडली होती. या पोस्टनंतर रत्नागिरीत एकच खळबळ उडाली. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने पोलिसांनीच पुढाकार घेत त्या तरुणीशी संपर्क साधला आणि पोलिसांनीच या प्रकरणातील संशयित आरोपी रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याला जेरबंद केले आहे. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात घडलेला वृत्तान्त सांगितल्यानंतर अवघ्या एका तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. याबाबत शहर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

कॉलेज मधील तरुणी घरी परतण्यासाठी जयस्तंभ येथे गाडीसाठी उभी होती. या थांब्यावर कुवारबावच्या दिशेने जाणारा संशयित रिक्षाचालक अविनाश म्हात्रे आला असता त्याच्या रिक्षात तरुणी बसली. जयस्तंभ ते कुवारबाव असा प्रवास करीत असताना रिक्षाचालकाचे मागे बसलेल्या तरुणीसोबत असभ्य अश्लील वर्तन सुरू होते. ही घटना १३ जून २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. तरुणीने भीतीपोटी सदर बाब कोणालाही सांगितली नाही. घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकार उघडकीला आणला होता. मात्र १४ जून २०२३ रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांच्या समोर उघड झाला.

रत्नागिरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षाचालकाला पकडण्यासाठी दोन पथके स्थापन केली. दोन्ही पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी संशयीत रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अवघ्या एका तासांमध्ये पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या. अविनाश म्हात्रे (अंदाजे वय ३५) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. संशयित रिक्षाचालकाला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. तसेच कलम 354 अ – लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयित आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीचे लाइव्ह लोकेशन ट्रेस करून संशयित आरोपी अविनाश म्हात्रे याच्या रिक्षात पोलीस बसले. आम्हाला मांडवी बीचला सोडा असे पोलिसांनी म्हात्रेला सांगितले. मांडवी बीचवर नजर फिरवून पोलीसांनी संशयित आरोपीला रीक्षासह अवघ्या एका तासात पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांच्या धडक कारवाईने रत्नागिरी किती सुरक्षित आहे हे सिद्ध झाले. रत्नागिरी पोलीसांचे कौतुक सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.