प्रवाशाकडे पैशांची मागणी करणाऱ्या तोतया टी.सी. ला अटक 

चिपळूण:- कोकणकन्या एक्स्प्रेस नं. ०११११ डाऊन सी.एस.टी मुंबई ते मडगाव जाणाऱ्या ट्रेनमध्ये ठाणे ते कणकवली दरम्यान डी २ या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे १५० रुपयांची मागणी करणाऱ्या बोगस टी.सी. विरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडले आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन संदीप कांबळे (३१, रा. कलमट बाजारपेठ, कणकवली ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते ४.३० च्या दरम्याने कोकणकन्या एक्स्प्रेस या मुंबई ते मडगाव जाणाऱ्या रेल्वेत डी -२ डब्यातून प्रवास करीत असता बोगस तिकीट चेकर (टी . सी) आरोपी नंदेश जयराम तांबे (३३, रा . पोफळवणे, बौद्धवाडी, दापोली ) याने डब्यात येऊन तुझे तिकीट दाखव, अशी विचारणा केली. कांबळे याने मोबाईलवर तिकीट दाखविण्याचा प्रयत्न केला असता रेंजमुळे ओपन झाले नाही म्हणून कांबळेकडे १५० रुपयांची मागणी केली. ते घाबरुन त्याने दिले. या तिकीट चेकरबाबत रेल्वे गार्ड यांच्याकडे चौकशी केली असता तो तिकीट चेकर नसून तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास हवालदार उल्हास भोसले करीत आहेत.