Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार सरी

प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार सरी

जिल्ह्यात सरासरी ४६.६६ मिमी पाऊस; रत्नागिरी शहरात सर्वाधिक ९१.०० मिमी पाऊस

रत्नागिरी:- जवळपास संपूर्ण जून महिना पावसाने पाठ फिरवल्यानंतर रविवारी मध्यरात्री पासून पुन्हा मान्सूनच्या जोरदार सरींनी जिल्हाभरात हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. सोमवारी सकाळच्या सत्रात किरकोळ हजेरी लावल्या नंतर सोमवारी दुपार नंतर दमदार पावसाने सर्वांना दिलासा दिला. दरम्यान पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

या हंगामात पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जून महिन्यातील सुरवातीचे दोन ते चार दिवस वगळता संपूर्ण जून महिना अक्षरशः कोरडा गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आणि पेरणी देखील पूर्ण केली. मात्र दोन दिवसांच्या हजेरीनंतर पावसाने पूर्णतः दडी मारली. अल निनोचा प्रभाव वाढल्याने यावर्षी पाऊस उशिराने दाखल होण्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आणि जून महिन्याच्या 20 तारखेपर्यंत पावसाने अक्षरशः पाठ फिरवली. शेती कोरडी पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली तर धरणातील पाणीसाठा घटू लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिमाण होऊ लागल्याने प्रशासन देखील चिंतेत आले होते.

रविवारी रात्रीपासून मान्सूनने जिल्ह्यात सक्रिय झाल्याची वर्दी दिली. रात्री बारा वाजल्या नंतर संपूर्ण जिल्हाभरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीतील अनेक भागात वादळी वाऱ्यांनी देखील रविवारी रात्री हजेरी लावली होती. रविवारी रात्री पावसाने हजेरी लावल्याने तापमान घटून वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली आणि दुपारपर्यंत उन्हाचा कडाका कायम होता. मात्र सायंकाळी चार वाजल्यानंतर आकाशात काळया ढगांनी गर्दी करत मान्सून दाखल झाल्याची वर्दी दिली. सोमवारी सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्या.

हवामान विभागाने मान्सून सक्रिय झाला असल्याचे सांगितले असून पुढील चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या चार दिवसात जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे.

गेल्या २४ तासांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४१९.९५ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ४६.६६ मिमी पाऊस पडला आहे. रत्नागिरी शहरात सर्वाधिक ९१.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गुहागर तालुक्यातही ७६.०० मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. राजापूरमध्ये ४६.६३ मिमी आणि दापोलीत ४५.०० मिमी पावसाने हजेरी लावली. खेड तालुक्यात ४१.७१ मिमी, संगमेश्वरमध्ये ३१.०८ मिमी, चिपळूणमध्ये ३०.८८ मिमी, लांजा तालुक्यात २९.४० मिमी आणि मंडणगडमध्ये २८.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असल्याने जनजीवन काहीसे संथ झाले असून प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.