प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यात जवळपास 70 उपोषणे 

रत्नागिरी:- २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० जणांनी विविध ठिकाणी न्याय हक्कासाठी उपोषण करणार असल्याचा इशारा पत्राद्वारे प्रशासनाला दिला आहे. यामध्ये आत्मदहन करणाऱ्या ५ जणांचा समावेश आहे. प्रशासन, पोलिस आदींच्यामाध्यमातून ही आंदोलने मागे घेण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाच्या चिटणीस शाखेने याला दुजोरा दिला.

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासनाकडुन न्याय मिळण्याच्या उद्देशाने या दिवशी उपोषण किंवा आंदोलन केली जातात. या दिवशी पालकमंत्री ध्वजारोहनासाठी रत्नागिरीत असतात. संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत असते. आपल्याला न्याय मिळणार याची पुर्ण खात्री उपोषणकर्त्यांना असते. लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री देखील त्याकडे सहानुभुतीपुर्वक विचार करतात. त्याचा फायदा उपोषणकर्ते, आंदोलक किंवा आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांना होता. म्हणून या दिवशी सर्वांत जास्त उपोषण असतात. त्यासाठी आदी आठ ते पंधरा दिवस प्रशासनाला पत्राद्वारे कळवावे लागते. जिल्ह्यातुन आतापर्यंत ३५ ते ४० जणांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. यामध्ये काही वैयक्तिक, शासकीय, पोलिस दल, पालिका आदी यंत्रणेशी संबंधित ही उपोषणं आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारण ६० ते ७० जण उपोषणाला बसणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तालुकास्तर, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रवेशद्वारा आदी ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

यामध्ये पाच जणांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून आत्मदहणाचा इशारा दिला आहे. यामध्ये राऊत एन्टरप्रायझेस (चिपळूण) येथील अरुण राऊत यांनी चिपळूण पालिकेकडे दिलेल्या अहवालाची सत्यतापडताळणी करायची होती. महिना झाले त्यावर काहीच कारवाई केलेली नाही. तसेच देयक आदा करत नसल्याबाबत अर्ज दिला होता. त्यावरही काहीच कारवाई नाही, म्हणूण पालिकेच्या कारभाराविरुद्ध आत्मदहणाचा इशारा दिला आहे. खेड येथील शैलेश पालांडे यांनी १७ वर्षाची मुलगी साक्षी बेपत्ता झाली आहे. तिचे अपहरण झाले असून अजून तिचा शोध लागलेला नाही. म्हणून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. संदिप श्रीधर देसाई (रा. ओरी) यांनी ओरी शाळेच्या इमारत दुरूस्तीचे काम आणि ओरी रस्त्याच्या कामा संदर्भात उपोषणाचा इशारा दिला आहे. कविता भाऊ कदम (चिपळूण) यांनी व़डिलोपार्जीत घर दिराच्या नावे करून देण्यात आल्याच आरोप केला आहे. त्यासाठी टेरव ग्रामपचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक आदींच्या मदतीने ते दीराच्या नावे करून घेतल्याचा आरोप करून आत्मदहनाचा इशारा दिली आहे. प्रशासनाच्या चिटणीस विभागाने याला दुजोरा दिला.