डॉ. मोहितकुमार गर्ग; मराठी पत्रकार परिषदेचे कार्य कौतुकास्पद
रत्नागिरी:- मराठी वृत्तपत्राचे जनक आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अतिशय कठीण काळामध्ये मराठी वृत्तपत्र चालविले. लोकशाही बळकटीची ती एक नांदी होती. आजही पत्रकारांनी तो दर्जा राखण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पोलिस, डॉक्टर आणि पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यात समन्वय असणे गरज आहे. मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकीतून केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. ही बांधिलकी आणि समाजाला दिशा देण्याचे काम अविरत चालू राहो, अशी सदिच्छा आहे, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पोलिस दल आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी केलेले योगदान सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्याचे अनुकरण करून पत्रकारांनी समाजाला दिशा द्यावी. जनता आणि पोलिसांचा सलोखा निर्माण व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो. मराठी पत्रकार परिषदेच्या समाजिक कामाचे कौतुक केले.
त्यानंतर कृतज्ञता पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी बेडेकर शासकीय रुग्णालयात 3 वर्षे काम करत आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याबद्दल जाहीर झालेल्या कृतज्ञता पुरस्काराने गौरविले. यावेळी त्यांचेे कुटुंबीय उपस्थित होते. जिल्ह्यात मनोरुग्णांना आधार आणि मायेची ऊब देत सुरक्षित मनोरुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळवून देणार्या राजरत्न प्रतिष्ठानलाही पुरस्काराने सन्मानित केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित तालुकाध्यक्ष राजेश शेळके यांनी केले. तर सूत्रसंचालन परिषदेच्या राज्यस्तरीय सदस्य जान्हवी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष श्रीकृष्ण देवरूखकर, माजी अध्यक्ष हेमंत वणजु, सचिव आनंद तापेकर, प्रशांत पवार, मुस्ताक खान, सतीश पालकर, रहिम दलाल, सिद्धेश मराठे, प्रशांत हरचेकर, जमिर खलपे, अलिमिया काझी, किशोर मारे पत्रकार उपस्थित होते.