पोलीस ठाण्यातच मुलाकडून आईला मारहाण

दापोली:- दापोली पोलीस ठाण्यात चौकशीच्या कामाला आलेल्या आईला तिच्या मुलानेच पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून खाली पाडून मारहाण केल्याप्रकरणी मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालगाव लष्करवाडी येथील सुरेखा गजानन कणकेकर (वय 70) व त्याचा मुलगा विनायक गजानन कणकेकर (वय 34) हे दापोली पोलीस ठाण्यात गुरूवारी सकाळी 10.30 वाजता चौकशीकामी आले होते. ते काम सुरु असतानाच पोलीस ठाण्यातच विनायक याने जमिनीच्या कारणावरून त्याची आई सुरेखा हिला शिवीगाळ करून खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी तीला मारहाण केली. या मारहाणीत सुरेखा यांच्या डाव्या हाताचे मधले बोट मोडले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेखा कणकेकर यांनी मुलाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.