पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला लुटले

चिपळूणमधील घटना; ९८ हजारांची सोन्याची चैन लंपास

चिपळूण:- शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करून एका ८० वर्षीय वृद्धाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिपळूण एसटी डेपोच्या बाजूला असलेल्या स्वागत हॉटेलसमोरील रस्त्यावर रविवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मार्कंडी येथील गगनगिरी सोसायटीत राहणारे शांताराम दौलतराव साळवी (वय ८०) हे रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी ११:३८ च्या सुमारास स्वागत हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात होते. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी साळवी यांना थांबवून “आम्ही पोलीस आहोत” अशी बतावणी केली.
​पुढील भागात तपासणी सुरू असल्याचे सांगून त्यांनी साळवी यांच्या अंगावरील सोन्याची चैन, हातातील घड्याळ आणि घराची चावी सुरक्षित ठेवण्यासाठी खिशातील रुमाल काढण्यास सांगितले. साळवी यांनी विश्वास ठेवून रुमाल बाहेर काढला.

​आरोपींनी मोठ्या चलाखीने साळवी यांच्याकडून चैन, घड्याळ आणि चावी घेतली. ती रुमालात बांधल्याचे भासवून तो रुमाल साळवी यांना परत केला आणि तेथून मोटारसायकलवरून पसार झाले. साळवी यांनी काही वेळातच संशयावरून रुमाल उघडून पाहिला असता, त्यात केवळ घड्याळ आणि घराची चावी होती. मात्र, सुमारे २ तोळे वजनाची ९८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन गायब होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाणे गाठले.

​या प्रकरणी शांताराम साळवी यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४६/२०२६) दाखल केला आहे.