रत्नागिरी:- अंदाजे सव्वा चार वर्षांपूर्वी देवरुख पोलिस ठाण्यांतर्गत साखरपा पोलिस दुरक्षेत्रातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावत जात त्याचा चावा घेउन जखमी करणार्या आरोपीला न्यायालयाने सोमवारी २ वर्ष साध्या केैदीची शिक्षा सुनावली.परंतू त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याने पुढील २ वर्ष चांगल्या वर्तवणूकीच्या बंधपत्रावर त्याची मुक्तताही करण्यात आली.
कमलेश हिराकंद चव्हाण( ४५ ,रा.साखरपा पत्कीवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात साखरपा दुरक्षेत्रातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय तुकाराम उकार्डे यांनी तक्रार दिली होती.त्यानूसार,९ सप्टेंबर २०१७ रोजी ते नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना सकाळी ११ वाजता कमलेश सारखरपा दुरक्षेत्र कार्यालयात आला होता.त्याने उकार्डे यांच्याकडे १३ जानेवारी २०१७ रोजी अपघातात दुखापत झाल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र मागितले.तेव्हा संबंधित वैद्यकिय अधिकार्यांकडे चौकशी करुन प्रमाणपत्र देण्यात येईल असे उकार्डे यांनी कमलेशला सांगितले.याचा राग आल्याने कमलेशने त्यांच्या अंगावर धावत जाउन त्यांच्या छातीवर जोराचा चावा घेतला.तसेच उकार्डे यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी संजय उकार्डे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात कमलेश विरोधात तक्रार दिली होती.त्यावरुन पोलिसांनी कमलेश विरोधात गुन्हा दाखल केला होता.









