पोलिस असल्याचे सांगत लाखाचे दागिने लंपास

चिपळूण:- पोलिस असल्याचे सांगून अनोळखी इसमाने दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना चिपळूण चिचनाका ते एस टी बस स्टँण्डकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी साडेबारा वाजण्याच्यादरम्यान ही घटना घडली . यामध्ये १ लाख १२ हजारांचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहेत . संबंधित फिर्यादी चिपळूण बाजारपेठेतून घरी परत जात असताना चिंचनाका ते एस.टी. बस स्टॅण्डकडे जाणाऱ्या मार्गावर एका अनोळखी इसमाने त्यांना थांबविले . आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व खिशातील साहित्य त्यांच्या रुमालाची गाठ मारून त्यात ठेवले . सदर माल फिर्यादीच्या पिशवीत ठेवून हातचलाखीने व फसवणूक करून फिर्यादीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले . यामध्ये ८८ हजार रूपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन , २४ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल चोरीस गेला आहे . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.