रत्नागिरी:- अमरावती येथून तडीपार केलेल्या तरुणाने रत्नागिरीत एका पोलिसाची दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरट्याला अवघ्या काहितासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्थानकातील पोलीस अंमलदार रोशन सुर्वे यांनी आपली दुचाकी रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रोडवर प्रभू फायनान्स समोर उभी करून ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी रोशन सुर्वे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रातीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.दं.वि.कलम ३७ ९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याची माहीती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात होताच रात्री गस्त्त व नाकाबंदी करता असणारे अधिकारी व अंमलदार यांना त्याबाबत तात्काळ माहीती देण्यात आली.
त्यानुसार मिरकरवाडा चौकी येथे कर्तव्याकरीता असलेले अंमलदार पोना संतोष करळकर हे जेवण करुन कर्तव्यावर परत जात असताना चोरीला गेलेली मोटरसायकल घेऊन एक तरुण त्यांना दिसून आला. यावेळी त्यांनी दुचाकी अडवून एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव अमित रामनारायण तिवारी (वय ४२ वर्षे , रा . बंडोरा ता.जि. अमरावती) असे असून त्याच्या पुर्व इतिहासाबद्दल खात्री करता त्याचेवर अमरावती तसेच इतर ठिकाणी एकुण ४१ गुन्हे दाखल असुन त्यालाअमरावती जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आलेले असल्याची माहीती मिळत आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकल व आरोपीचा शोध हा पोलीस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल लाड, पोउनि धनंजय चव्हाण, पोहवा संतोष गायकवाड, पोना संतोष करळकर, पोना रोशन सुर्वे घेतलेला आहे .