पोलिसांनी उभारले अद्ययावत कोविड सेंटर

रत्नागिरी:- फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनाच ऑक्सिजन बेड मिळाला नाही. पोलिस दलाच्या अतिशय जिव्हारी लागली कोरोना काळातील ही वस्तुस्थिती. मात्र त्यातून असे काही घडले की, ते पाहून अनेकांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी पोलिस दलाने एमआयडीसीत साधे-सुधे नाही, तर ‘हायफाय पोलिस कोविड सेंटर’ उभारले आहे. 46 बेडचे हे सेंटर असून 5 ऑक्सिजन बेड आहेत.

कोरोना महामारीमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य विभागाबरोबर पोलिस राबत आहेत. कर्तव्याबरोबर कायदा व सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्तीत देखील पोलिस काम करत आहेत. कर्तव्य बजावत असताना वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत असल्याने काही कर्मचारी कोरोना बाधित झाले. मात्र वेळ प्रसंगी पोलिस कर्मचार्‍यांनाच ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचे प्रकार पुढे आले. त्यामुळे पोलिस दलाने स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातून मिरजोळे एमआयडीसीमध्ये हायफाय कोविड सेंटर उभे राहिले आहे. यामध्ये पोलिस दलातील अधिकारी, अंमलदार यांच्या कुटुंबीयांसाठी ते असणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रावाळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांच्याहस्ते जिल्हा पोलिस दलाच्या या कोविड सेंटरचे इ-लोकार्पण करण्यात आले. कोविड सेंटरमुळे पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला मोठा आधार मिळणार आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदत झालीआहे.