रत्नागिरी:- पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून महिलेवर सुरीने वार केल्याची घटना जयगड येथील वाटद येथे शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. घडली. या प्रकरणी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाटद-कांबळेलावगण येथे एकाने किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की करत तिच्या पाठीत सुरीने वार केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास घडली. सचिन सदाशिव धातकर (35,रा.वाटद- कांबळेलावगण फाटा, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात दीक्षिता दिलीप धातकर (46, रा.वाटद- कांबळेलावगण फाटा, रत्नागिरी ) यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सचिन धातकर आणि दीक्षिता धातकर यांनी एकत्रित जागा घेऊन त्यात चाळ टाईप घर बांधून ते वेगवेगळे राहतात. त्यांच्यात नेहमी वादही होत असतात. काही दिवसांपूर्वी खंडाळा दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या घरी येऊन सचिन कुठे राहतो असे विचारले. तेव्हा दीक्षिताने पोलिसांना सचिनचे घर दाखवले होते. या रागातून शुक्रवारी सचिनने दीक्षिताला शिवीगाळ व धक्काबुक्की करत तिच्या पाठीत सुरीने वार करत तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवी करत आहेत.