पोलिसांच्या तावडीतून निसटला आरोपी

रत्नागिरी:- १७ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला संदीप बापू शेळके (२८) हा संशयित आरोपी चिपळूण पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे.

माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिपळूण पेढांबे येथे घटनास्थळी त्याला पोलिस घेऊन गेले असता त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली असून पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संदीप बापू शेळके या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार केले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.अधिक तपास करताना पोलिसांना सबळ पुरावे हाती लागल्यानंतर संदीप शेळके याच्यावर काही दिवसांपूर्वी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. पोस्को अंतर्गत तपास सुरू असताना त्याला सोमवारी घटनास्थळी नेऊन पोलिस अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला होता त्याठिकाणी त्याचे काका रामभाऊ शेळके यांच्या घरात त्याला घेऊन गेले असता त्याने संधी साधून घराच्या मागील बाजूने तो जंगलाच्या दिशेने पळत सुटला. एका महिला कॉन्स्टेबलने त्याचा जोरदार पाठलाग देखील केला. मात्र तो निसटून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर व जंगल पिंजून काढला असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

पेढांबे कोळकेवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रभारी पोलीस पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.