पोलिसपाटलांच्या शेतातील खैराच्या झाडांची चोरी

मंडणगडातील घटना : चोरीचे सत्र सुरूच

मंडणगड:- तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर झाडांच्या चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने खैर तोडीसंदर्भातील – नियम बदलल्यानंतर खैर चोरीच्या घटना वाढत असून, नुकत्याच घडलेल्या घटनेत चोरट्यांनी पोलिसपाटलांच्या मालकीची ३० ते ३५ खैरांची झाडे – लांबवल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मौजे आंबवणे खुर्द येथील पोलिसपाटील किरण दीपक तांबे यांच्या मालकीच्या जागेतील झाडांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. चोरीच्या घटनेची नोंद बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून खैर चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असतानाही कोणत्याही प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

खैर चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. चोरी झालेला माल नेमका कुठे जातो आणि यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तक्रार होऊनही पोलिस प्रशासनाने योग्य तपास केला नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास ढळेल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. नुकसानभरपाईचा प्रश्न अनुत्तरित खैर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न धोक्यात आले आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या विषयावर प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.