पोफळी येथे कीटकनाशक प्यायल्याने प्रौढाचा मृत्यू

कौटुंबिक तणावातून टोकाचे पाऊल

खेड:- चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने वैयक्तिक तणावातून विषप्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष गणपत घाडगे (वय ५४, रा. पोफळी, रूम नं ६४/१) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष घाडगे यांनी शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर वैयक्तिक तणावातून घरातील फवारणीचे कीटकनाशक/बुरशीनाशक औषध प्राशन केले. काही वेळातच त्यांना उलट्या होऊ लागल्याने मुलगा निखिल घाडगे व नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी घाणेखूंट येथील परशुराम
हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

शनिवारी सकाळी १०.३० वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास त्यांना मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, मुंबईला घेऊन जात असताना त्यांची हालचाल बंद झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती रात्री १०.१५ वाजता त्यांना मयत घोषित केले.

​याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोफळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.