पोटच्या मुलीला ठार मारणाऱ्या आईला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- सतत रडत असल्याच्या कारणातून पोटच्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबुन तिचा जीव घेणार्‍या महिलेला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

शाहिन आसिफ नाईक (36 मुळ रा.अलोरे चिपळूण सध्या रा.कुवारबाव-पारसनगर,रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित मातेचे नाव आहे. तिची 8 महिन्याची मुलगी हुरेन आसिफ नाईक ही बुधवार 24 सप्टेंबर रोजी सतत रडत होती. घरात कोणीही नसल्यामुळे शाहिन हिने रागाच्या भरात तिच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून तिचे नाक दाबत तिचा जीव घेतला. काही वेळानंतर शाहिनची धाकटी बहिण घरी परतल्यानंतर तिला हुरेनचा आवाज न आल्याने तिने शाहिनकडे हुरेनची विचारणा केली असता तिने ती झोपली असल्याचे सांगितले. परंतू शाहिनच्या बहिणीला शंका आल्यानंतर तिने हुरेनला तडक जिल्हा शासकिय रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी हुरेनला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी शाहिनला अटक करुन गुरुवारी न्यायलयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.