दाभोळ पिसईतील घटना; यंत्रणेकडून ताब्यात
दापोली:- सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाबाधित पाचशेपेक्षा अधिक आढळून आले. दरम्यान, ॲण्टीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच चार जणांनी केसपेपरसह प्राथमिक आरोग्य केंद्रातून पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी त्यांच्या घरी पोचले. जिल्ह्यात शनिवारी 515 बाधितांची भर पडली. दोन दिवसांत दहा जणांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात आरटीपीसीआर चाचणीत 308 आणि ऍण्टीजेनमध्ये 207 रुग्ण बाधित आले. एकूण रुग्ण 15 हजार 75 झाले. सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या चिपळूण तालुक्यात 179 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्या पाठोपाठ रत्नागिरीत 114 जण बाधित आहेत. दापोली 16, खेड 80, गुहागर 36, संगमेश्वर 41, मंडणगड 2, लांजा 20, राजापूर 27 बाधित सापडले. एकूण तपासणीच्या तुलनेत बाधितांचा टक्का 10.70 टक्केवर पोचला. कोरोना प्रतिबंधासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांची रत्नागिरी रेल्वेस्थानकात ऍण्टीजेन चाचणी सुरू आहे. शुक्रवारी एका दिवसात 200 प्रवाशांच्या चाचण्या केल्या असून त्यात दोघे बाधित सापडले. जिल्ह्यात प्रत्येक स्थानकावर तपासण्या होत आहेत.
दरम्यान, दापोली काळकाई कोंड येथे राहणारे 4 जण पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रात ऍण्टीजेन टेस्ट करण्यासाठी आले होते. ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्याक्षणी त्यांनी आरोग्य केंद्रातून केसपेपरसह पळ काढला. त्यात दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीही आता पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्या चौघांविषयी दापोली पोलिस ठाणे, नगरपंचायत दापोली व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.